मराठी भाषा आणि तिचे संवर्धन
31 Aug 2024
मराठी भाषा ही भारतातील प्रमुख भाषांपैकी एक असून, ती महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. हजारो वर्षांच्या संस्कृतीचा वारसा घेऊन, मराठी भाषा आजही तिची ओळख आणि महत्त्व कायम ठेवून आहे. तथापि, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात, जागतिकीकरणामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाची आवश्यकता वाढली आहे. मराठी भाषेचे संवर्धन म्हणजे केवळ तिच्या शब्दसंग्रहाचा समृद्धीकरण किंवा व्याकरणाच्या नियमांचे पालन करणे नाही, तर मराठी भाषेतील साहित्यातील विविधतेला जोपासणे, भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविणे, तसेच नव्या पिढीला मराठी भाषेची ओढ निर्माण करणे महत्त्वाचे आहे.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी खालील उपाययोजना केल्या जाऊ शकतात:
1. वाचन आणि लेखनाची सवय: शाळांमध्ये मराठी पुस्तकांचे वाचन आणि लेखनाची सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे आवश्यक आहे. वाचनामुळे भाषेचा गोडवा, तिची समृद्धी आणि वैविध्यपूर्णता लक्षात येते. विविध स्पर्धा, वाचनालये आणि मराठी पुस्तकांचे वितरण हे वाचनाची सवय लागण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.
2. मराठी भाषा दिवसाचा उत्सव: शाळांमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिवस साजरा करून विद्यार्थ्यांना भाषेचे महत्त्व पटवून द्यावे. या दिवशी भाषण स्पर्धा, निबंध लेखन, कविता सादरीकरण इत्यादी उपक्रम राबवले जाऊ शकतात.
3. स्थानिक साहित्यावर आधारित अभ्यासक्रम: विद्यार्थ्यांना स्थानिक मराठी साहित्यकारांच्या साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश करून, त्यांना त्यांच्या भाषेतील महान लेखक, कवी यांची ओळख करून द्यावी.
4. साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम: शाळांमध्ये साहित्यिक कार्यक्रम, कथाकथन, नाट्य सादरीकरण, आणि मराठी भाषेवरील कार्यशाळा आयोजित केल्या जाऊ शकतात. यामुळे विद्यार्थ्यांना भाषेचा अभिमान आणि तिची उपयुक्तता पटेल.
शाळा हे शिक्षणाचे मंदिर असल्यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये भाषेचे बीज रोवण्याचे कार्य शाळाच करू शकते. शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे म्हणजे केवळ एक विषय म्हणून पाहणे नसून, ती विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला समृद्ध करणारी, त्यांची भाषा आणि साहित्यिक दृष्टिकोन विस्तारणारी असावी. शाळा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढाकार घेऊ शकतात आणि विद्यार्थी भाषेच्या अभ्यासात प्रवीण होण्यास प्रेरित होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे मुख्य कारण म्हणजे ती आपली मातृभाषा आहे. मातृभाषेची ओळख टिकवणे आणि तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मराठी भाषेचा अभिमान बाळगणे म्हणजे केवळ तिच्या भाषेत बोलणे नाही, तर तिच्या साहित्याचा अभ्यास करणे, ती साहित्यिक परंपरा समजून घेणे, आणि तिच्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे संवर्धन हे समाजाच्या सर्व घटकांचे कर्तव्य आहे. शाळांमध्ये मराठी भाषेचे महत्त्व पटवून देऊन, विद्यार्थ्यांनी भाषेचा अभिमान बाळगावा आणि तिचे संवर्धनासाठी योगदान द्यावे, ही काळाची गरज आहे. यामुळे मराठी भाषा फक्त शिकण्यापुरती मर्यादित न राहता, ती जगण्यासाठीची एक प्रेरणा आणि आत्मसन्मानाची ओळख होईल.
लेखिका: वर्षा बाविस्कर,
मराठी शिक्षिका